Жазылу
हरिनामाची गोडी Harinamachi Godi भजन म्हणजे काय? भजन म्हणजे मनाची एकाग्रता. भजनातील शब्द, अर्थ, विचार, संगीत - स्वर, ताल, लय, वाद्य, टाळ या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे भजन होय. भजन म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण, भजन म्हणजे आत्मोन्नती, होकारात्मक विचार, मनाचे आरोग्य, शारीरिक व्याधी विसरणे, बुद्धिचा विकास करणे. भजन गाणारा साधक परमेश्वराच्या नावाचे शब्द, त्याचा अर्थ आणि ते उच्चारण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वरांशी एकरूप होतो. भजन म्हणजे परमेश्वराच्या शक्तीची अनेक रूपे आहेत. प्रत्येक रूपाचे नाव वेगळे अशा वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झालेल्या परमशक्तीचे नाव घेत बसले तर मनात कसलेही वाईट विचार येत नाहीत. भगवंताचे रूप आपल्या नजरेसमोर जसेच्या तसे उभे राहते आणि त्यातच आपले मन रमते. मनावर त्याच गुणांचे संस्कार होतात. भजन म्हणजे भक्तीचा सर्वात सोपा प्रकार. सतत म्हटलेल्या भजनातून मनामध्ये भक्तीचाच आविष्कार होतो आणि साधक परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. भजनाने माणूस सतत परमेश्वराशी एकरूप होऊन राहातो. त्यामुळे त्याच्या हातून कर्मही चांगले घडते.