Рет қаралды 178
सदैव आनंदाचा सोपा राजमार्ग! आनंदी विचार करा, आनंदी रहा, निरोगी रहा! आनंदाचे डोही आनंद तरंग! मित्रांनो, सुख ही संकल्पना शारीरिक आहे. सुख हे शरीराला कळतं. तुमच्या इंद्रियांना कळतं. सुखानं माणूस सुस्तावतो. आनंद मात्र मानसिक आहे. आनंदात माणूस उल्हसित राहतो. सुखी नसलेला माणूस आनंदीत राहू शकतो. पण माणूस आनंदीत नसेल तर सुखाचा उपयोग होत नाही. शारीरिक श्रमात सुख नसले तरी आनंद असू शकतो. शरीराला श्रम देऊनही आपण आनंदीत राहू शकतो. किंबहुना आनंदीत राहिल्यामुळे आपण आधीकचे श्रम करू शकतो. दिवसभर शिकारी मागं धावूनही आदिवासी रात्री पुन्हा त्याच थकलेल्या पायांनी नृत्य करतात. म्हणजे स्वतःच्या शरीराला एका अर्थाने सुखी न ठेवता पुन्हा पुन्हा राबवून आनंद मिळवतात. नृत्य करतात. गाडगेबाबा नेहमी म्हणायचे, हे शरीर म्हणजे परमेश्वराने तुम्हाला दिलेलं भाड्याचं गाढव आहे, त्याला जास्तीत जास्त राबवून, त्याच्याकडून काम करून घ्या. म्हणजे त्याला फार सुखात ठेवू नका. असं म्हणत असताना गाडगेबाबा कुणाचा आनंद हिरावत नव्हते.
त्यामुळे सुखाच्या पाठीमागं न लागता आनंदाच्या शोधात राहिलं पाहिजे. आनंद ही संकल्पना तुम्ही एकदा मनाशी जोडली की मग भौतिक वस्तूमध्ये तुम्हाला फारसं अडकावं लागत नाही. कोरोना काळात भोवती आनंद नव्हता पण त्या काळात काही गोष्टी मनासारख्या करण्यासाठी अवकाश मिळाला. कशाच्या तरी मागं सुरू असलेली धावाधाव संपल्यामुळे आणि कुणीच, कुठूनच तुम्हाला अडथळा करणार नसल्यामुळे, त्या काळात एकाग्र होऊन ज्या गोष्टी करता आल्या त्या आधीच्या आयुष्यात कधीच करता आल्या नव्हत्या. हे अचानक आपल्या लक्षात आलं. दुःखातही तुम्हाला आनंदाचा शोध घेता येतो. दुःख तुम्हाला वेगळा विचार करायला लावतं. माझ्यासारख्या कवीला दुःखाचा काळच अधिक सृजनाचा वाटतो. त्याच काळात नवं काही सुचण्याचा आणि लिहून होण्याचा संभव असतो. बाहेरून जेवढा दुःखाचा मारा झाला तेवढा आतला सृजनाचा झरा मोकळा होत जातो. दुःख तुम्हाला उदात्त बनवत असतं.