Рет қаралды 3,328
#स्त्रीयांचे आरोग्य
ज्या देशातील स्त्री शिक्षित, सुरक्षित आणि निरोगी आहे तो देश समृद्ध आहे. माती आणि माता यांच्या सृजनशिल गुणधर्मावर ह्या विश्वातील संपूर्ण घडामोडी चालू आहेत. साधारणत: कौटुंबिक जबाबदारी, समाजातील, आणि कुटुंबातील दुय्यम स्थान यामुळे स्त्रियांच्या सर्वांगीण आरोग्याकडे दुर्लक्ष होतांना दिसते. तसेच बदलत्या काळानुसार आणि वयोमानानुसार स्त्रियांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. स्त्रियांमध्ये मासिकपाळी समस्या, गर्भावस्था, मेनोपोझ (रजोनिवृत्ती) अशा वेगवेगळ्या टप्यावर विविध शारीरिक आणि मानसिक बदल घडून येतात. तेंव्हा ती अवस्था समजून घेणे हि केवळ पतीचीच जबाबदारी नसून संपूर्ण कुटुंबाने आणि पर्यायाने समाजाने येथील स्त्री शक्तीचे संरक्षण, संगोपन केले पाहिजे हीच काळाची गरज आहे. आजी, आई, ताई, पत्नी, कन्या, मैत्रीण, वाहिनी, काकू, आत्या अशा विवध छटांनी नटलेली स्त्री हे विश्व सर्वांगसुंदर करण्यासाठी आणि सर्वांच्या आनंदासाठी हसत हसत अहोरात्र कष्ट उपसत असते. अत्यंत कठीण आणि पुरुषाला अशक्यप्राय असणारी कामे स्त्री हि लीलया करते, यशस्वी होते. तेंव्हा तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे.
#स्त्रीयांचे सामाजिक स्थान आणि आरोग्य
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या भारतातील महिला आपल्या आरोग्याकडे मात्र हवे तेवढे लक्ष देत नाहीत. शहरातील सुमारे ३० टक्के महिलांना स्तनांच्या कॅन्सरचा धोका असल्याचे वैद्यकीय सर्वेक्षणातून समोर आले आहे. स्त्रियांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. स्त्रियांमध्ये संधिवात, डायबेटिस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारीही वाढत आहेत.
भारतात स्त्रियांचे आरोग्य म्हणजे केवळ गरोदरपण व बाळंतपण एवढ्यापुरतेच मर्यादित असल्यामुळे शहर व ग्रामीण भागांतील असंख्य महिला कॅन्सरला बळी पडत आहेत. स्तनाचा कॅन्सर झालेल्या दहापैकी पाच महिलांचा मृत्यू होतो, एका वैद्यकी पाहणीत आढळळे आहे. याचा अर्थ, भारतात स्तनाच्या कॅन्सरविषयी जनजागृतीचे प्रमाण खुपच कमी आहे. स्त्रियांचे मानसिक आरोग्य, जननसंस्थेचे आजार, स्तन व गर्भाशयाचा कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदींबाबत जरी सरकारने महिलांच्या आरोग्यविषयक उपक्रम राबविल्यास अनेक महिलांचे जीव वाचवू शकतात. भारतातील महिलांना स्तनाचा कॅन्सर होण्याचा कायमस्वरूपी धोका १२ टक्के असतो. स्तनाच्या कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास पेशंट पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यासाठी शालेय जीवनापासूनच मुलां-मुलींमध्ये याविषयी योग्य वैद्यकीय माहिती पुरवली गेली पाहिजे.
#स्त्रीयांचे मानसिक आरोग्य आणि समाज
आपल्याकडे अनेक स्त्रियांना चाळीशीच्या आतच अत्यंत त्रासदायक सांधेदुखीचा त्रास चालू होतो. स्त्री आरोग्य म्हणजे बाळंतपण एवढ्यावरच मर्यादित न रहाता स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे. अॅनिमिया (रक्तक्षय), गर्भारपणातील आजार, गर्भाशयाचा कॅन्सर आणि डायबेटिसविषयी भारतातील प्रत्येक महिलेला योग्य माहिती पुरवली पाहिजे. भारतामध्ये कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये मृत्यूचे प्रमाणही खूप आहे. स्त्रियांनी निकोप शरीर व निकोप मन याचा आग्रह धरलाच पाहिजे. हा प्रश्न भावनिक पातळीवर न पाहता स्त्री आरोग्याशी संबंधित हवा. सामाजिक परिप्रेक्ष्यातून या प्रश्नांकडे डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, स्त्रिया व त्यांचे कुटुंबीय पाहतील, तर स्त्रियांचे आरोग्य अबाधित राहील. आरोग्यपूर्ण जीवन जगणे हा तिचा हक्क आहे.