Рет қаралды 3,966
==============================
आयुष्य नव्याने जगणे मी जमेल का ते बघतो
प्रेताला माझ्या सजणे मी जमेल का ते बघतो
या रंगमंचकावर मी अद्याप शिकावू आहे
निर्व्याज फुलांचे हसणे मी जमेल का ते बघतो
बांधली समाधी माझी मी मरण्याआधी ज्यांनी
सत्कार तयांचे करणे मी जमेल का ते बघतो
रात्रीच्या काळोखाने जे दान दिले स्वप्नांचे
सांभाळाया ही किरणे मी जमेल का ते बघतो
घेतले ठसे बोटांचे खंजीर जप्तही केला
पण हात खरा ओळखणे मी जमेल का ते बघतो
प्रतिकूल स्थिती असतांना जोमात वाढतो आहे
पिंपळापरी या रुजणे मी जमेल का ते बघतो
पाषाण लीलया फुटले खिडक्यांचे गजही तुटले
रेशीम अता कातरणे मी जमेल का ते बघतो
शेंदूर फासुनी मजला पाषाण बनविले त्यांनी
माणूस म्हणोनी जगणे मी जमेल का ते बघतो
==============================