Рет қаралды 6,027
"तालमीत विचारपूर्वक, मेहनतीने बसवलेली प्रत्येक हालचाल, संवादाची लकब, संगीत वाजण्याची जागा ह्यांपैकी एक जरी गोष्ट प्रत्यक्ष प्रयोगात ठरल्यासारखी झाली नाही तर मी अत्यंत अस्वस्थ होतो. कलाकारांनी बनचुके होणं आणि त्यामुळे प्रेक्षकांनी ह्या जादुई क्षणांना मुकणं ही मला नाटकाशी केलेली प्रतारणा वाटते."
मंगेश कदम
स्वतःला संपूर्णपणे झोकून देऊन, तन्मयतेने आणि आनंदाने प्रत्येक कलाकृती सादर करणाऱ्या मंगेश सरांना एक ज्येष्ठ व्यावसायिक दिग्दर्शक म्हणावं की नाटकाच्या मंतरलेल्या जगात स्वेच्छेने हरवलेला छोटा मुलगा असा प्रश्न पडतो!
गेल्या २५ वर्षांत त्यांनी 'अधांतर', 'एका लग्नाची गोष्ट', 'अशी पाखरे येती', 'तू तू मी मी', 'कबड्डी कबड्डी', 'जादू तेरी नजर', 'बेईमान', 'वैशाली कॉटेज', 'गोष्ट तशी गमतीची', 'के दिल अभी भरा नही' यांसारखी बहुविध, दर्जेदार आणि लोकप्रिय नाटकं मराठी रसिकांसमोर सादर केली आहेत.
नेपथ्य, नटांच्या हालचाली, संगीत इत्यादी सर्व अंगांबद्दलच्या सूचना प्रत्यक्ष लिहिलेल्या नसल्या तरी संहितेत कशा लपलेल्या असतात; आणि त्यांचा शोध घेतल्याने दिग्दर्शकाला आशयाशी सुसंगत आणि प्रभावी सादरीकरण कसं करता येतं हे अनेक उदाहरणांसहित मंगेश सरांनी त्यांच्या मुलाखतीत उलगडून सांगितलं आहे.
ह्याशिवाय आपल्याला हव्या असलेल्या नटांची निवड काही कारणांनी करता आली नाही तरी आहेत त्या नटांना अपेक्षित व्यक्तिरेखेपर्यंत कसं पोचवावं, प्रकाश योजनेचा सिनेमातील 'क्लोज-अप' तंत्रासारखा वापर कसा करावा, दिग्दर्शकाने 'सहिष्णु' का असायला पाहिजे इत्यादी अंगांबद्दल पण आजच्या भागात मंगेश सर विस्तृतपणे बोलले आहेत.