Рет қаралды 1,370
दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पालघर, समाज कल्याण विभाग. राज्य तंबाखू नियंत्रण कक्ष आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा सरावली (वाढीव) येथे तंबाखूच्या प्रतीकात्मक होळीचे आयोजन करण्यात आले. देशात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात लाखो कर्करोग पिडीत रुग्ण आढळतात. त्यात दरवर्षी हजारो नवीन रुग्णांची भर पडत आहे . युवकांमध्ये कर्करोगाच्या प्रमाणात दरवर्षी मोठी वाढ होत आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचे समाजावर मोठे दुष्परिणाम होत आहेत. अनेकांना कर्करोगासारख्या भयानक आजाराला सामोरे जावे लागत आहे . शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे. महाराष्ट्राची नवी पिढी व्यसनमुक्त आणि आरोग्य संपन्न राखणे ही आपली जबाबदारी आहे.
जिल्हा परिषद शाळा सरावली (वाढीव).केंद्र माकणे , तालुका पालघर ,जिल्हा पालघर येथे जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधत शाळेच्या सहकार्याने तंबाखू विरोधी उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नशामुक्त भारत अभियान चे सदस्य व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा संघटक श्री.मिलिंद रूपचंद पाटील यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम व व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन केले. यावेळी सदर कार्यक्रमात माकणे केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ.दीपिका नाईक सरावली गावच्या सरपंच सौ.सविता नाईक , शाळा व्यवस्थापन समिती , मातापालक, ग्रामस्थ, शाळेच्या प्रमुख शिक्षिका सौ.स्वेजल म्हात्रे, शिक्षिका श्रीम.दिपा तिवाड व शाळेतील विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तंबाखूच्या प्रतीकात्मक होळीचे दहन करून तंबाखूमुक्त जीवनाची शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.