Рет қаралды 10,448
"संहितेतील स्वल्पविराम आणि पूर्णविरामांच्या व्याकरणापलीकडे जाऊन नटांना व्यक्तीरेखेचं व्याकरण समजून घ्यायला मदत करणं हे दिग्दर्शक म्हणून माझं काम आहे असं मी मानतो ".
विजय केंकरे
१९८५ साली राज्य नाट्य स्पर्धेत गाजलेल्या ऑथेल्लो ह्या नाट्यकृतीपासून आजतागायतच्या प्रदीर्घ दिग्दर्शकीय प्रवासात विजय सरांनी 'ससा आणि कासव', 'ढोलताशे', 'सुंदर मी होणार', 'श्रीमंत', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे', 'लेकुरे उदंड झाली', 'संगीत पूर्णावतार' , 'नकळत सारे घडले', 'जावई माझा भला', 'हा शेखर खोसला कोण आहे', 'तीन पायांची शर्यत' यांसारखी ९० हून अधिक बहुढंगी नाटकं सादर केली आहेत.
संहितेतील शब्दांपलीकडे जाऊन दृश्यात्मक मार्गाने नाटकाचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोचावा यावर विजय सरांचा भर असतो. त्यासाठी ते सूचक नेपथ्य, नटांचे अर्थपूर्ण आकृतिबंध, नेमक्या हालचाली आणि कथानक उलगडण्याची लय ह्या सर्व बाबींचा कसा वापर करतात ह्याबद्दल आजच्या भागात समजून घेता येईल. त्याचबरोबर नव्या-जुन्या लेखकांबरोबर आणि नटांबरोबर काम करताना अत्यंत खेळीमेळीचं आणि विश्वासाचं वातावरण तयार करण्यामागची त्यांची भूमिकाही जाणून घेता येईल.
अनेक वर्षं पाश्चात्य रंगभूमीवरील विविध नाट्यप्रयोग साक्षेपीपणे पाहून "त्यांची नाटकं: वेस्ट एन्ड व्ह्याया ब्रॉडवे' हे पुस्तक विजय सरांनी लिहिलं आहे. एक मराठी रंगकर्मीं म्हणून पाश्चात्य नाट्यव्यवहार आणि सादरीकरणापैकी विजय सरांना काय भावले आणि शिकायला मिळाले तेही ऐकूया आजच्या भागात.