Рет қаралды 2,422
शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
नाव शिवनेरी
उंची ३५०० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव जुन्नर
डोंगररांग नाणेघाट
सध्याची अवस्था सर्वात चांगली
स्थापना ११७०
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.
शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
संपादन
गडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.
साखळीची वाट :
या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.
सात दरवाज्यांची वाट :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.
कसे जाल ?
संपादन
मुंबईहून माळशेज मार्गेः
जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर '८ ते ९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास मुंबईपासून एक दिवस लागतो
पुणेहून नारायणगाव मार्गेः
पुणे मधून नारायणगाव पर्यंत साधारणतः 75 कि.मी. अंतरावर पुणे-नाशिक मार्गे व त्यानंतर नारायणगाव-जुन्नर मार्गे 15 कि.मी.
महादेव कोळी चौथरा...........
शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले.यात सरनाईकाच्या कुटूंबाला,नातेवाईकांना तसेच 52 मावळातील देशमुख/नाईकांना यांची धरपकड करून शिरछेद करण्यात आला. यात लहान मुले तसेच स्त्रियांचा देखील समावेश होता. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव होऊ नये म्हणून मोघलांनी असे भयानक दुष्कृत्य केले.